कोकणात आंब्याची, कैऱ्याची फारच रेलचेल असते. कैरी म्हणजे कच्चा आंबा. मध्यम वाढलेला फार छोट्या किवा कोवळ्या कैर्यांची चव तुरट किवा थोडीफार कडू असते. त्यामुळे मध्यम आंबे हे जास्त प्रमाणात असा प्रकारचे पटकन होणारे लोणचे करण्यासाठी वापरले जातात.
हे ठेवणीचे लोणचे नाही. पटकन होणारे, खूपच चविष्ट, ताजे, तिखट आणि आंबट लोणचे डाळ भात, चपाती किंवा भाकरी बरोबर खाल्ले जाते. आमच्या घरातील हि एक पारंपारिक रेसिपी आहे. आम्ही लहान असताना असा प्रकारचे लोणचे घरात बर्याचदा केले जात असे. ही माझ्या आजीची रेसीपी आहे. वेळे अभावी ठेवणीचे लोणचे जमत नसेल आणि कैऱ्यांचा मोसमात हे लोणचे केले जाते.
कैऱ्या ताज्या आणि कमी आंबट असतील तर हे लोणचे आणखीनच चविष्ट लागते.

- Preparation Time
15 minutes - Cooking Time
5 minutes - Serves
4 adults - Difficulty
Easy
साहित्य

- कच्चे आंबे – 1 कप – एकदम बारीक तुकडे केलेले (जून असतील तर कैरीमधील कोय किवा बाट काढून घेतलेले)- मी ईथे तोतापुरी आंबा वापरला आहे.
- साखर – एक छोटी चिमूटभर
- हळद – १ टीस्पून
- लाल तिखट पावडर – १ १/२ टेबलस्पून (चवीनुसार कमी जास्त करता येते.)
- मीठ चवीनुसार
- फोडणीसाठी –
- तेल – ३ टेबलस्पून
- लसूण पाकळ्या – ४-५ सोलून बारीक चिरलेल्या
- राई – १/२ टेबलस्पून जाडसर भरड केलेली किवा बारीक राई असेल तर अक्खी ठेवली तरी चालते. (जास्त बारीक करू नये.)
- हिंग – १/२ टीस्पून
- मेथी पावडर – १ टीस्पून
कृती
- एक वाडग्यात बारीक कापलेल्या आंब्याच्या फोडी, हळद आणि मीठ लावून १५ मिनिटांसाठी ठेवा.

- लाल तिखट पूड, साखर टाका. व्यवस्तिथ मिक्स करून घ्या.

- एका तडका पॅन मध्ये किंवा टोपात तेल टाका. आच मंद ठेवा. थोडे गरम झाले कि त्यात कापलेली लसूण टाका.


- लसूण थोडी ३/४ भाजल्यावर राई टाका. तडतडू द्या.
- त्यात हिंग, मेथी पावडर टाका. १/२ मिनिट तसेच ठेवा. गॅस बंद करून तडका थोडा थंड होऊ द्या.
- तो कैरींच्या फोडीवर टाका. मिक्स करून घ्या.

- मीठ आणि तिखट आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता.
- छोट्या बरणीत भरून रेफ्रिजेरटर मध्ये ठेवावे किवा वरण-भाताबरोबर सर्व करा.

टीप
- मीठ आणि तिखट आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता.
- मी तोतापुरी वापरला. कुठलाही आंबा किंवा कैरी चालू शकते. कैरी जास्त आंबट असल्यास मिठाचे प्रमाण वाढेल.
- हे लोणचे एक आठवडा फ्रीज मध्ये चांगले राहते.